Thursday, April 12, 2012

रामरेकी

॥श्रीः॥
रामरेकी.

“रामरेकी म्हणजे काय?” हे ऐकण्यासाठी आपण येथे जमला आहात. आपल्या कुतुहलाचे रूपांतर अंतिमतः लाभात आणि आनंदात होवो, अशी इच्छा प्रगट करून विषयाला सुरुवात करतो.
मर्यादापुरुषोत्तम राम हा परमेश्वराचा अवतार आपल्याला माहिती आहे. ’रेकी’ या जपानी शब्दाचा अर्थ “वैश्विक ऊर्जा” हा आहे. स्पर्शाच्या माध्यमातून विश्वांतील ऊर्जेच्या मदतीने मुख्यत्त्वे स्वास्थ्य आणि अंतिमतः कल्याण प्राप्त करण्यासाठी ’रेकी’ केली जाते. काहीजण यासाठी परमेश्वराची आराधना करतात. राम हीच ती वैश्विक ऊर्जा या विचाराने “रामरेकी” हा शब्द सुचला.
या रामरेकीसाठी मार्गदर्शक आधार आपली रामरक्षा. त्यांत प्रथमतः रामाचे ध्यान करून त्याने आपल्या शरीराचे रक्षण करावे अशी प्रार्थना केली जाते. सामान्यतः रेकीमध्येही वैश्विक ऊर्जेला आवाहन केले जाते. तिच्या साह्याने निरामय आरोग्यप्राप्तीसाठी शरीराच्या विविध भागांवर दोन्ही हातांचे तळवे ठेवून मन एकाग्र करून संवेदनांवर लक्ष केंद्रित करायला सांगतात. हे एक साम्य लक्षणीय आहे.
रेकीमध्ये अमूर्ताला आवाहन आहे. तुलनेने सगुण,साकार रामाची मूर्ती डोळ्यासमोर आणणे सर्वसामान्यांना सोपे वाटते. गुडघ्यापर्यंत लांब हात असणारा धनुर्धारी सर्वशक्तिमान राम आपले रक्षण करण्यास समर्थ आहे, हा विश्वास आपल्याला वाटतो. तो आपल्या मिटलेल्या डोळ्यांसमोर मूर्तिमंत दिसू लागतो. बुधकौशिक ऋषींच्या चित्रदर्शी वर्णनामुळे हे सहज शक्य होते.
अत्यंत सोप्या भाषेत, अर्थवाही नेमक्या शब्दयोजनेमुळे केवळ सहा श्लोकांत प्रतिभावान बुधकौशिक ऋषींनी जे साधले आहे त्याने आपण नतमस्तक होतो. या सहा श्लोकांत रामचरित्र तर उभे केले आहेच पण डोक्यापासून पायापर्यंत शरीराच्या अवयवांचा क्रमाने निर्देश केला आहे. राम शब्दाची पुनरुक्ती न करता गुणवर्णनपर रामाची अनेक नांवे समर्पकपणे योजल्यामुळे भाषावैभव आणि प्रसादगुणयुक्त काव्यप्रतिभा यांचा परिचय आपल्याला होतो.
शहाण्या माणसाने रामरक्षा वाचावी, पाठ करावी कारण ती पापांचा नाश करणारी आणि सर्व कामना पूर्ण करणारी आहे. (रामरक्षां पठे‍त्‌ प्राज्ञः पापघ्नीं सर्वकामदाम्‌।) असे सांगून पुढे एकेका अवयवाचे रक्षण रामाने करावे अशी प्रार्थना आहे. शिरो मे राघवः पातु। रघुकुळांत जन्मलेला (राघव) माझ्या डोक्याचे रक्षण करो येथून सुरुवात करून अखेरीस सर्व शरीराचे रक्षण राम करो, असे म्हटले आहे. येथे आपल्या तळहातांनी एकेक अवयवाला स्पर्श करून रामाचे स्मरण केल्याने आरोग्यलाभ होतो असा अनुभव येतो.
• यात शरीराचे आलेले अवयव पुढे दिले आहेत. शरीराचे अवयव. (क्रमाने डोक्यापासून पायांपर्यंत हे याचे वैशिष्ट्य आहे.)
शिर: (डोके), भालं (कपाळ), दृशौ (डोळे), श्रुती (कान), घ्राणं (नाक), मुखं (तोंड), जिव्हां (जीभ), कण्ठं (गळा), स्कंधौ (खांदे), भुजौ (बाहू), करौ (हात), हृदयं (हृदय), मध्यं (मधला भाग), नाभिं (बेंबी), कटी (कंबर), सख्थिनी (मांड्यांचा मागचा भाग), ऊरू (मांड्या), जानुनी (गुडघे), जंघे (पोटर्‍या), पादौ (पाय)
• रामाची विविध नांवे / विशेषणे. (भाषासौंदर्य - पुनरुक्ती नाही.)
राघव (रघुकुळांतील), दशरथात्मज (दशरथाचा मुलगा), कौसल्येय (कौसल्येचा मुलगा), विश्वामित्रप्रिय (विश्वामित्रांना प्रिय असणारा), मखत्राता (यज्ञाचे रक्षण करणरा), सौमित्रीवत्सल: (लक्ष्मणावर प्रेम करणारा), विद्यानिधि: (विद्येचा साठा), भरतवंदित: (भरताने वंदन केकेला), दिव्यायुध: (दिव्य शस्त्रांनी युक्त), भग्नेशकार्मुक: (शिव धनुष्याचा भंग करणारा), सीतापतिः (सीतेचा पति), जामदग्न्यजितः (परशुरामाला जिंकणारा), खरध्वंसी (खरराक्षसाचा नाश करणारा), जांबवदाश्रयः (जांबुवानाने ज्याचा आश्रय घेतला आहे असा), सुग्रीवेशः (सुग्रीवाचा स्वामी), हनुमत्प्रभुः (हनुमानाचा प्रभू), रघूत्तमः (रघुकुळातील उत्तम), रक्षकुलविनाशकृत् (राक्षसकुळाचा नाश करणारा), सेतुकृत् (सेतु म्हणजे पूल म्हणून पुलाचा कर्ता म्हणजे राम), दशमुखांतकः (दशाननाचा-रावणाचा अंत करणारा), बिभीषणश्रीदः (बिभीषणाला राज्यवैभव देणारा)
• कालानुक्रमानुसार रामाची गोष्ट (क्रमाने येणारे चरित्रांतील प्रसंग.)
कुळाचा उल्लेख, जनकजननींची नांवे, गुरुंचे नांव, गुरुगृही शिक्षण(यज्ञांचे रक्षण), भावांवर प्रेम, त्यांचे आदरस्थान, पराक्रम (धनुर्विद्या), शिवधनुर्भंग, सीतेचे पाणिग्रहण, परशुरामावर विजय, खर नांवाच्या राक्षसाचा वध, जांबुवानाला आश्रय, सुग्रीवाचा स्वामी, हनुमानाची भेट, राक्षसकुलाचा नाश, सेतुबंधन, रावणाचा वध, बिभीषणाला राज्यप्रदान.
हातपाय धुऊन देवापुढे स्वस्थ बसावे. डोळे मिटावे. रामरक्षा म्हणावी व ती म्हणताना अर्थानुकूल एकेक अवयवावर ध्यान करून त्या अवयवाच्या स्वास्थ्यासाठी रामाचे स्मरण करावे. तो राम त्या अवयवाचे रक्षण करो असे पूर्ण विश्वासाने म्हणावे. त्या त्या अवयवाची व्याधी दूर होते याचा अनुभव घ्यावा. रेकीच्या पद्धतीने त्या त्या अवयवावर दोन्ही हातांचे तळवे अलगद स्पर्श करून मिळणार्‍या स्पंदनांचा अनुभव घ्यावा.
मनापासून दृढ विश्वासाने रामरक्षा म्हटल्यास मिळणारी फलश्रुती “...स विरायु, सुखी, पुत्री, विजयी, विनयी भवेत्‌।“ ही सांगितली आहे. दीर्घायुष्य, सुख, संतती, विजय, विद्वत्तेमुळे असणारी विनयवृत्ती. आणखी माणसाला काय हवे? पण पूर्वार्धात “...रक्षां यः सुकृती पठेत्‌ “ असे म्हटलॆ आहे. सुकृती म्हणजे चांगली कृती, पुण्यकृत्य. रेकीमध्ये अशीच ५ तत्त्वे संगितली आहेत.
१) कृतज्ञतेचा भाव बाळगीन. (Just for today, I will have the attitude of gratitude)
२) काळजी करणार नाही. (Just for today, I will not worry)
३) कोणावर रागवणार नाही.( Just for today, I will not be angry)
४) प्रामाणिकपणे काम करीन (Just for today, I will do my work honestly)
५) प्रत्येक जीवमात्रावर प्रेम करीन, आदराने वागीन. (Just for today, I will show love and respect to every living being)
आपल्या संस्कृतीत यांचा आग्रह नेहमीच धरला जातो.
१) डोळ्यांनी बघतो, ध्वनी परिसतो कानी पदी चालतो।
जिव्हेने रस चाखतो मधुरही वाचे सदा बोलतो॥
हाताने बहुसाल काम करतो, विश्रांतीही घ्यावया।
घेतो झोप, सुखे फिरुनी उठतो, ही ईश्वराची दया॥ असा कृतज्ञतेचा भाव नेहमी मनांत असावा.
२) चिंता, क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा। याद्वारे मुक्ताबाई किंवा
३) नकोरे मना क्रोध हा खेदकारी। सारखे मनाचे श्लोक रागवू नका हेच आपल्याला सांगत नाही का?
४) स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धीं लभते नरः। हा गीतेचा श्लोक आपले काम चोख करा असेच सांगतो, नाही का?
५) जे जे भेटे भूत ते ते मानी भगवंत। म्हटल्यावर आपोआपच दुसर्‍यांशी वागतांना प्रेम आणि आदरच व्यक्त होणार.
रेकीच्या निमित्ताने याची थोडीफार आठवण होते आणि अंमलात आणण्यासाठी आपण प्रयत्नशील होतो. परमेश्वराची कृपा होते. स्वास्थ्यलाभ आणि अंतिमतः कल्याण साधते.
सर्व इच्छा, कामना पूर्ण करणारी रामरक्षा सर्वांनी म्हणावी यासाठी त्या प्रभु रामचंद्रांना प्रार्थना करतो- “बुद्धी दे रघुनायका।“ आणि विश्व कल्याणासाठी सांकडे घालतो:
सर्वेsत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया:।
सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित्‌ दुःखमाप्नुयात्‌॥

भालचंद्र अवधूत नाईक. संपर्क क्र. ९८२०६८२३२८



अभिप्राय
१)From: Naresh Joshi
Sent: Thursday, March 8, 2012 9:50 PM
आदरणीय नाईक साहेब,

अतिशय उत्तम रित्या रेकी आणि राम रक्षा यांचा संबंध उलगडलाय .
हीच क्रिया शवासनात हि सर्व अवयवांवर लक्ष केंद्रित करतांना होते आणि शरीराला पूर्ण आराम मिळतो.

तसेच रेकीची ५ मूलतत्वे आणि संत वांग्मय ,गीता इत्यादितली अत्यंत सोपे पणाने विषद केलेली तत्वे---
शेवटी जग हे एक लहान खेडेच!

असो, धन्यवाद, मलाही थोडा विचार करायला प्रवृत्त केल्यासाठी!

नरेश जोशी

२) From: Bhal Patankar gr8warrier@yahoo.com
नमस्कार,
श्री भालचंद्र नाईक ह्यांनी सुरेख वर्णन केलेले लिखाण वाचून आनंद झाला व त्याबद्दल त्यांचे व आपले आभार
धन्यवाद,
भाल पाटणकर

३) From: Jaiprakash Haldankar
Ati sunder ,aapalya avinashi vaishvik thevyachi (GLOBAL DEPOSITS ) jaaniv karun dilyabaddal laksha laksha dhanyawad..Ata Ramraksheche manan ,chintan, pathan ani acharan adhik dolaspane navhe sarvach panchendriyanchya sahyane karata yeyil.Ho ani ata Nitin Gadkarinna Ram Gadkari sambodhita yeyil- Aso punahscha dhanyawad.Jai Shriram.

J S Haldankar

४) From: "Divakar Kulkarni" dvkulkarni.2007@rediffmail.com
सप्रेम नमस्कार,
राम रेकी चे विवेचन फार आवडले. आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या वाचक सभेत ते वाचून दाखवणार आहे. तुमचे काम कसे चालले आहे?पुण्याला कधी आल्यास जरूर भेटू. मध्यंतरी वसुधा चाचड भेटल्या होत्या.
नीलिमाताई याना नमस्कार.
ललिता कुलकर्णी.
६) From: bhaskar kanitkar kbhaskar461@yahoo.co.in
सर,

आपणास माहित असेलच पण रहावत नाही म्‍हणून उत्‍तर पाठविण्‍याचे धाडस करीत आहे. रामरक्षा म्‍हणजेच रामसहस्‍त्रनामावली आहे असे मला वाटते. क्षमस्‍व.

का नि ट क र, ना गा
७) From: Premanand Samant
रामरक्षेचा रेकीशी जोडलेला संबंध फारच सुंदर ! अप्रतिम ! लेख आवडला .पाठव ल्या बद्दल
धन्यवाद !
८) From: "D R Nayak" Mon, 12 Mar 2012 18:17:47
My Dear,
How can I praise your article? I am at a loss for words. It is superb. Great. The analogy you have drawn between Reiki and Ramraksha is very convincing and it shows your intellectual prowess.

With regards,
D. R. NAYAK
Dy. Gen. Manager - Technical & Marketing
........................................................................
B. E. Billimoria & Co. Limited
Dear Shri. Bhalchandra Naik

Superb. The striking similarities between different cultures across the world as also the uniqueness and resemblances underlying the fundamental principles of several religions, is a subject which is worth studying and such studies and research could offer great thoughts and ideas to the mankind, which can bring about true and satisfying welfare, happiness and well being of the society .

Your Article is one such study, which deserves a rich Applaud. Great work indeed.

With warm regards,

Yours truly,

Avinash M. Puranik

2012/3/29 Bhalchandra Naik

नवीन जवाबदारी

टाटा पॉवरच्या

ग्राहक गार्‍हाणे निवारण मंचावर

सदस्य म्हणून

माझी नेमणूक

दि.२८/११/२०११ पासून झाली आहे.

कळावे
आपला स्नेहांकित,
भालचंद्र नाईक.

Tuesday, September 20, 2011

महाराष्ट्र टाइम्स दि. २०/०९/२०११

डॉ. रामदास गुजराथी
अध्यक्ष, मुंबई ग्राहक पंचायत

ग्राहकांच्या तक्रारींची सोडवणूक करण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा करण्यात आला व त्रिस्तरीय न्याययंत्रणा निर्माण करण्यात आली. पण महाराष्ट्रात जिल्हा स्तरावरील जिल्हा ग्राहक मंचांची स्थिती अत्यंत बिकट होत चालली आहे, असे चित्र दिसून येते. महत्त्वाचे म्हणजे सरकारकडूनच या ग्राहक मंचांची हेळसांड केली जात आहे.

ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहकांच्या तक्रारींची सोडवणूक करण्यासाठी त्रिस्तरीय न्याययंत्रणा निर्माण करण्यात आली. जिल्हास्तरावर ग्राहक मंच, राज्य स्तरावर ग्राहक आयोग तर देशाच्या स्तरावर राष्ट्रीय आयोगाची तरतूद करण्यात आली. प्रत्येक स्तरावरील अधिकारकक्षा आखून देण्यात आल्या. यंत्रणा अत्यंत सुटसुटीत करण्यात आली. न्याय-निवाड्याची कालमर्यादा निश्चित करण्यात आली. त्यामुळे ग्राहकांना विनाविलंब न्याय मिळण्याची व्यवस्था निर्माण झाली. स्वाभाविकपणे जागृत ग्राहकांनी आपल्या तक्रारी सोडविण्यासाठी या न्याययंत्रणेचा आधार घेतला. गेल्या २५ वर्षांत सुमारे ४० लाख तक्रारी संपूर्ण देशभर या त्रि-स्तरीय न्याय यंत्रणेकडे आल्या, हे या कायद्याचे यश मानले पाहिजे. परंतु अलीकडे महाराष्ट्रात जिल्हा स्तरावरील जिल्हा ग्राहक मंचांची स्थिती अत्यंत बिकट होत चालली आहे, असे चित्र दिसून येते. महत्त्वाचे म्हणजे सरकारकडूनच या ग्राहक मंचांची हेळसांड केली जात आहे.

पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात एकूण ४० जिल्हा ग्राहक मंच निर्माण केले गेले आहेत. एकूण जिल्ह्यांच्या संख्येपेक्षा ग्राहक मंचांची संख्या अधिक आहे; कारण काही जिल्ह्यांत जादा जिल्हा मंच निर्माण केले गेले आहेत. ग्राहक संरक्षण कायद्याच्या तरतुदींप्रमाणे प्रत्येक जिल्हा मंचावर तीन सदस्य असणे आवश्यक आहे. त्यातील एक अध्यक्ष, एक महिला सदस्य व तिसरा सदस्य असतो, हा नियम आहे. कामकाजाच्या सोयीसाठी मंचाचा अध्यक्ष व अन्य एक सदस्य बैठकीस उपस्थित असले तरी मंचाचे कामकाज पार पाडता येते. ही एक अपवादान्मक तरतूद आहे. परंतु ग्राहकांच्या दुदैर्वाने सध्या महाराष्ट्रातील सुमारे ४०पैकी १२ मंचांवर फक्त अध्यक्ष व एक सभासदच नियुक्त केल्याचे आढळून येते. बीड, रायगड, ठाणे (जादा), चंदपूर आदि जिल्हा मंचांची ही स्थिती झाली आहे. त्यामुळे अध्यक्ष किंवा सदस्य बैठकीसाठी उपस्थिती गेली तीन-चार वषेर् असूनही त्यात राज्य आयोगाकडून अथवा राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याकडून काहीच सुधारणा केली जात नाही. ग्राहक संरक्षण कायद्याच्या मूळ आणि महत्त्वाच्या तरतुदीलाच सुरुंग लावला गेला आहे, असे खेदाने म्हणावेसे वाटते.

खरे पाहता राज्य आयोगाने आणि ग्राहक संरक्षण खात्याने सभासद नियुक्तीसाठी एक व्यापक यादी तयार करून ठेवायला हवी. ज्या ज्या सभासदांची मुदत संपेल, त्यांच्याजागी या यादीच्या आधारे नवीन अध्यक्षाची किंवा सदस्याची त्वरित नियुक्ती व्हायला हवी. परंतु अशा संकलित माहितीच्या अभावी अध्यक्ष व सदस्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया प्रदीर्घ काळ प्रलंबित राहते व त्यामुळे ग्राहक मंचाच्या कामावर प्रतिकूल परिणाम होतो. म्हणून असे सुचवावेसे वाटते की, सरकारने राज्यातील ग्राहक संघटनांच्या सहकार्याने मंचावर काम करू शकणाऱ्या पात्र महिलांची व व्यक्तींची परिपूर्ण यादी तयार करावी व त्या यादीचा वापर तत्परतेने करावा. ग्राहक संघटना अनेक सेवाभावी व कार्यकुशल व्यक्तींची नावे निश्चित सुचवू शकतील.

दुसरी एक गंभीर व बेकायदा गोष्ट म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील ४० पैकी ११ जिल्हा ग्राहक मंचांचे कामकाज महिन्यातील १५ दिवस बंद ठेवण्याची अतिशय विघातक पद्धत महाराष्ट्रात अवलंबलेली दिसून येते. ही पद्धत महाराष्ट्र राज्य आयोग ग्राहक संरक्षण खात्याच्या आशीर्वादाने अवलंबित असावा अशी शंका वाटते, ठाणे (जादा), मुंबई उपनगर, नागपूर (जादा) आदि मंचांची स्थिती शोचनीय झाली आहे. या पद्धतीने ग्राहक संरक्षण कायद्याच्या प्रामाणिक हेतूंनाच सुरुंग लावला गेला आहे. महाराष्ट्रातील सर्व ग्राहकांना त्याची कल्पना देऊन हे पाऊल उचलले गेले असते, तर ते काही प्रमाणात समर्थनीय ठरले असते. पण तशी स्थिती महाराष्ट्रात नाही. आजही हजारो केसेस प्रलंबित आहेत.

या पद्धतीमुळे सरकारचा काही प्रमाणात आर्थिक फायदा झाला असला तरी सर्वसामान्य ग्राहकांच्या नुकसानीची मोजदाद कोण व कशी करणार? मंचाचे कामकाज १५ दिवस बंद ठेवण्याची ही प्रथा ग्राहकांच्या हिताची नाहीच, पण ग्राहकांच्या सुखाची देखील नाही. अन्यथा या प्रथेचे अलिखित तरतुदीत रूपांतर व्हायला वेळ लागणार नाही. ग्राहकांना जलद न्याय द्यावयाचा असेल, अल्प खर्चात न्याय व संरक्षण द्यावयाचे असेल तर सर्व मंचांचे कामकाज महिनाभर अबाधितपणे चालविले गेले पाहिजे. त्यादृष्टीने ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम १३ (१) (अ) आणि (ए) मधील तरतुदी अत्यंत स्पष्ट आहेत. या तरतुदींना छेद देणारी प्रथा त्वरित बंद व्हायला हवी.

आणखी गंभीर बाब म्हणजे १५ दिवस मंचांचे कामकाज बंद ठेवण्यासंबंधी सरकारी परिपत्रक (त्नक्र) निघालेले दिसत नाही. संबंधित मंच सदस्यांनाच पत्रे लिहून मंच १५ दिवस बंद ठेवण्याची सूचना केली आहे. म्हणून सरकारने यासंबंधीचे धोरण जाहीरपणे ग्राहकांना सांगण्याची गरज निर्माण झाली आहे.अशा पद्धतीमुळे मंचावरील सदस्यांच्या मानधनावर निश्चितच प्रतिकूल परिणाम झाला असणार. त्यामुळे मनापासून मंचाचे काम करण्याची त्यांची प्रेरणा नष्ट झाल्यास त्यांना जबाबदार धरता येणार नाही.

काही मंचांच्या अध्यक्षांना दोन दोन मंचांचे काम पाहावे लागते. ही स्थिती देखील ग्राहक संरक्षण कायद्याला न्याय देणारी नाही. 'ग्राहक हिताय, ग्राहक सुखाय' पुढील मागण्या महाराष्ट्र सरकार व राज्य आयोगाकडे कराव्याशा वाटतात. १. सरकार व राज्य आयोगाने एका महिन्याच्या आत सर्व ४० जिल्हा ग्राहक मंचांवर प्रत्येकी तीन सदस्य नियुक्त करावेत.२. काम असो अथवा नसो, कुठल्याही मंचांचे कामकाज १५ दिवस किंवा काही दिवसांसाठी देखील बंद ठेवू नये. ३. पुढील तीन महिन्यांत राज्य आयोगाने व शासनाच्या ग्राहक संरक्षण खात्याने महाराष्ट्रातील ग्राहक संघटनांच्या सहकार्याने जिल्हा मंचावर नियुक्ती होऊ शकेल अशा पात्र व्यक्तींची विस्तृत यादी तयार करावी.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10048054.cms

ग्राहक मंचांनाच संरक्षणाची गरज डॅ।.रामदास गुजराथी

ग्राहक मंचांनाच संरक्षणाची गरज!-लेख-संपादकीय ...
2 तासांपूर्वी ... ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहकांच्या तक्रारींची
सोडवणूक करण्यासाठी त्रिस्तरीय न्याययंत्रणा निर्माण
करण्यात आली. ... ग्राहक संरक्षण कायद्याच्या
तरतुदींप्रमाणे प्रत्येक जिल्हा मंचावर तीन सदस्य असणे
आवश्यक आहे. ...
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10048054.cms

Tuesday, July 5, 2011

बोरीवली व्याख्यान

बोरीवली विभागाच्यावतीने रविवार दि.२४ जुलै २०११ या दिवशी संध्या.४.३० वा ज्येष्ठालय,कस्तुरपार्कच्यामागे, शिंपोली,बोरीवली(प)येथे श्री.बाळकृष्ण भागवत यांचे "देहदान" या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे.

सर्वांनी उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा, ही विनंती.

Wednesday, December 30, 2009

कार्यकर्ता निर्माण.

स्वयंसेवी संस्थांच्या राष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने शनिवार दि.१२ डिसें.व रविवार दि.१३ डिसें. या दिवशी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, केशवसृष्टी, उत्तन येथे "कार्यकर्ता निर्माण" या विषयावर एक शिबीर आयोजित करण्यात आले होते.

या शिबिराला मुंबई ग्राहक पंचायतीच्यावतीने खालील ४ प्रतिनिधी उपस्थित होते.
श्रीम.ज्योती वैद्य.(दादर-माहीम-वांद्रे विभाग)
श्रीम.रंजना सावंत.(अंधेरी-जोगेश्वरी विभाग)
श्रीम.मानसी नाईक.(विरार विभाग)
श्रीम.अनुराधा चिमडे.(कांदिवली विभाग)

शिबीर अत्यंत उपयुक्त,माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी होते.

Thursday, December 24, 2009

बदलती जीवनशैली आणि ग्राहक चळवळ

(आधार:महाराष्ट्र टाइम्स दि.२४/१२/२००९)

डॉ. रामदास गुजराथी
अध्यक्ष, मुंबई ग्राहक पंचायत

(सातत्याने विकसित होत जाणारी नवी खचिर्क जीवनशैली आपल्या देशातील नीतिमूल्यांवर घाव घालणारी आहे. कारण त्यासाठी प्रत्यक्ष उत्पन्नापेक्षा अधिक उत्पन्नाचे स्रोत निर्माण करावे लागतात आणि अशा स्रोतांच्या शोधासाठी भ्रष्टाचाराच्या मार्गांचा कळत न कळत अवलंब करावा लागतो. अशी माणसं ग्राहक चळवळीला कोणता आधार देणार? आजच्या भारतीय ग्राहक दिनानिमित्त या आव्हानाचा परामर्श... )

जागतिकीकरणाच्या लाटेने केवळ आपल्या अर्थव्यवस्थेवरच परिणाम केला नसून आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनावर देखील दूरगामी परिणाम केला आहे. आज आपण 'भारतीय नागरिक' म्हणून नव्हे तर 'जागतिक नागरिक' म्हणून जीवन जगणे अधिक पसंत करू लागलो आहोत. परिणामी आपल्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल झालेला दिसून येतो. नाविन्याची ओढ एकसारखी वाढत आहे.

आपली जीवनशैली बदलली म्हणजे नेमके काय घडले? या प्रश्नाचे उत्तर विस्ताराने देता येईल. परंतु काही वैशिष्ट्यपूर्ण बदलांचाच येथे मी विचार करणार आहे. ग्राहक चळवळीतील एक कार्यकर्ता म्हणून हे बदल मला प्रकर्षाने जाणवतात आणि भिववितात देखील.

गेल्या २०-२५ वर्षांत 'आहेरे' (Haves) आणि 'नाहीरे' (Have nots) मधील अंतर भरमसाठ वाढले आहे. तंत्रज्ञानाधिष्ठित समाजात ज्ञानाचे महत्त्व वाढल्यामुळे 'आहेरे' वर्गाच्या उत्पन्नात भरमसाठ वाढ झाली असून त्यांच्याकडे आवश्यकतेपेक्षा अधिक पैसा येत आहे. आज आपण आपल्या देशात तीन लाखांपासून ६८-७० लाखांच्या दरवषीर्च्या पॅकेजेसची भाषा बोलू लागलो आहोत. काही हजारांत उत्पन्न कमावले, त्यांच्या घरात आता लाखाने उत्पन्न येऊ लागले. स्वाभाविकपणे या लोकांची जीवन जगण्यासंबंधीची 'अभिप्सा' बदलली. त्यांना सर्व उत्तम दर्जाच्या आणि आकर्षक अशा गोष्टींचे आकर्षण वाटू लागले. महागड्या गोष्टींकडे कल वाढला. जगाला भेडसावणाऱ्या महागाईविषयी त्यांची तक्रार नाही. कारण त्यांना अधिक खर्च करणे शक्य आहे. म्हणून ते साध्या दुकानात न जाता मॉल्सच्या वाटेने जाऊ लागले आहेत. या ग्राहकवर्गाने 'महागड्या जीवनशैलीचा' मनापासून स्वीकार केलेला दिसून येतो. क्वालिटी महत्त्वाची, किंमत दुय्यम.

अलीकडच्या आधुनिक कुटुंबात दोन गोष्टींचा शिरकाव झालेला दिसून येतो. त्या म्हणजे, प्रत्येक गोष्टीसाठी 'होम डिलिव्हरी' आणि 'किचनलेस फॅमिली'. या दोन्ही गोष्टी बदलत्या जीवनशैलीची खास वैशिष्ट्ये आहेत. किराणा माल मागवायचाय? करा दुकानदाराला फोन आणि द्या ऑर्डर. या फोनवरील मागणीला पूर्ण करणारी 'होम डिलिव्हरी' आजची जीवनशैली बनू पाहत आहे.

त्याचवेळी मुंबई-पुणे-अहमदाबाद अशा काही शहरांत 'किचनलेस होम' ही संकल्पना रूढ होत असताना दिसत आहे. तरुण जोडप्यांनी तिचा अवलंब करायला सुरुवात केली आहे. सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत घराबाहेर असलेल्या या तरुण जोडप्यांना 'किचन'ची आवश्यकताच भासत नाही. सकाळचा चहा-नास्ता बाहेर. दुपारचे जेवण ऑफिसच्या कँटिनमध्ये आणि रात्रीचे घरी परतताना चांगल्या हॉटेलमध्ये. ही जीवनशैली विकसित होत गेल्यावर घर हे विश्रामगृह बनेल आणि 'आमच्या घरी जेवायला या' या वाक्याची सामाजिक जीवनातून हकालपट्टी होईल.

यातूनच 'युज अँड थ्रो कल्चर' (वापरा आणि फेका संस्कृती) उभे राहत असल्याचे दिसून येते. कोणतीही वस्तू फार काळ वापरायची नाही किंवा घरात ठेवायची नाही. वस्तू वापरायची आणि तिची अल्पकाळातच विल्हेवाट लावायची हे या कल्चरचे वैशिष्ट्य. माझ्या आईचे लग्न १९व्या वर्षी झाले, पण वयाच्या ५०व्या वर्षापर्यंत लग्नातील शालू तिच्याजवळ होता. तिला त्याचा अभिमानही वाटे. पण आता कोणतीही वस्तू लवकर 'रिप्लेस' करण्याची प्रवृत्ती वाढत आहे.

२०-२५ वर्षांपूवीर् प्रत्येक घरात टेलिफोन होता अशी स्थिती नव्हती. पण कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीने क्रांती घडवून आणली असून आज 'मोबाईल' हे एक खेळणे झाल्यासारखे वाटते. माध्यमिक शाळेत जाणाऱ्या मुलामुलींपासून वयाची पंचाहत्तरी पूर्ण केलेल्या व्यक्तीच्या हाती मोबाईल दिसून येतो. मोबाईलशिवाय अनेकांचे काम अडते. इतका मोबाईल आपल्या आजच्या जीवनात अविभाज्य झाला आहे. नाशिकला ११० मोबाईल टॉवर्सना सील ठोकले, तर लाखाच्यावर मोबाईल बंद पडले. सर्व ग्राहक जाहीर तक्रार करू लागले. ही स्थिती सर्व भारतभर आहे.

अशा या बदलत्या जीवनशैलीचा देशातील ग्राहक चळवळीवर काय परिणाम होणार हा खरा चिंतेचा प्रश्न आहे. उपभोगप्रधान समाजातील ग्राहक देशातील ग्राहक चळवळीला उपयुक्त ठरतील का, हा खरा सवाल आहे. अशा उच्चभ्रू समाजातील लोकांना ग्राहक चळवळीची आवश्यकता वाटेल का? असे ग्राहक सहजरीत्या संघटित होतील का? पैशाच्या जोरावर ते सर्व प्रकारचे सुख उपभोगू शकतात. त्यांना ग्राहक चळवळ आवश्यक वाटेल का? अशा ग्राहकांचे प्रश्न सामान्य ग्राहकांच्या, गरीब ग्राहकांच्या प्रश्नांपेक्षा भिन्न असणार यात शंका नाही. इंटरनेटच्या जमान्यात वावरणारे हे सुशिक्षित आणि उच्च मध्यम वर्गातील ग्राहक एकत्र येऊन ग्राहक चळवळ समर्थ करण्यास किती उपयुक्त ठरतील, याविषयी मी साशंक आहे. म्हणून इंटरनेटच्या युगातील ग्राहक चळवळीसंबंधी गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता ग्राहक संघटनांपुढे निर्माण झाली आहे.

आजच्या तरुण ग्राहकांच्या उपभोगविषयक सवयी अत्यंत 'खचिर्क' होत चालल्या आहेत. याचाच अर्थ त्यांच्याकडून टिकावू (sustainable) जीवनशैलीचा अव्हेर होत आहे. भारतीय समाजात टिकावू जीवनपद्धतीचा शतकानुशतके अवलंब केला गेला पण गेल्या २०-२५ वर्षांत विचित्र चित्र निर्माण होत असल्याचे दिसते. उपभोगावर संयम ठेवणे आवश्यक आहे याची जाणीव करून द्यायला हवी आहे, कारण कर्ज काढून उपभोग घेण्याची वृत्ती वाढत आहे. पूवीर्चा अशिक्षित ग्राहक कर्ज काढून थाटात मुलीचे लग्न करायचा आणि व्यापारी आणि सावकाराकडून लुबाडला जायचा. तशीच परिस्थिती या सुशिक्षित केडिट कार्ड अथवा डेबिट कार्ड धारकांची होत आहे. ग्राहक चळवळीपुढे हे एक वेगळेच आव्हान आहे.

सातत्याने विकसित होत जाणारी ही नवी जीवनशैली आपल्या देशातील नीतिमूल्यांवर घाव घालणारी आहे. कारण खचिर्क जीवनशैली जगण्यासाठी प्रत्यक्ष उत्पन्नापेक्षा अधिक उत्पन्नाचे सोत निर्माण करावे लागतात आणि अशा सोतांच्या शोधासाठी भ्रष्टाचाराच्या मार्गावर कळत न कळत चालत जावे लागते. नंतर तो मार्ग स्वीकारला जातो. आज अशी माणसे या नवीन जीवनशैलीचा यथेच्छ उपभोग घेताना दिसत आहेत. अशी माणसं ग्राहक चळवळीला कोणता आधार देणार? आणि ग्राहक चळवळ 'अशा' ग्राहकांच्या आधारावर का चालवायची याचाही विचार करावा लागणार.

पुढील दहा वर्षांत जीवनशैली अशीच वेगाने बदलत गेली तर ग्राहक चळवळ ही 'कागदावरील चळवळ' या स्वरूपात राहील किंवा समाजातील केवळ उपेक्षित ग्राहकांसाठीच राबविली जाईल आणि शेवटी इतर चळवळींचे जे झाले, तेच ग्राहक चळवळीचेही होईल. भक्कम आधाराशिवाय कोणतीच चळवळ उभी राहू शकत नाही आणि तिची वाढही होऊ शकत नाही. अशा भक्कम आधाराचा शोध घेण्याचे आव्हानात्मक काम ग्राहक संघटनांना या पुढील काळात करावे लागणार आहे.